Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

राज्यातील सरकार असंवेदनशील आणि घाबरट - चंद्रकांत दादा पाटील

राज्यातील सरकार असंवेदनशील आणि घाबरट - चंद्रकांत दादा पाटील

लातूर : जनादेश नसताना महाराष्ट्रात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेत आले यापैकी एका पक्षाने तर आमच्यासोबत कौल मागितला आणि नंतर ज्यांनी विरोधात निवडणूक लढवली त्यांची मदत घेऊन सरकार बनवले. या सरकारने राज्याची वाट लावली असून हे असंवेदनशील आणि घाबरट सरकार आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रपरिषदेत बोलताना केली.

चंद्रकांत दादा पाटील आढावा बैठकीसाठी लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीस पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रमुख आ.संभाजीराव पाटील निलंगेकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, आ.अभिमन्यु पवार,माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत दादा म्हणाले की, राज्यातील शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. अतिवृष्टीने नुकसान झाले असून सोयाबीन व कापूस यासारखी पिके गेली आहेत. निसर्ग वादळानेही प्रचंड नुकसान केले आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत असत परंतु आता त्यांनी केवळ १० हजार रुपयांची मदत घोषित केली आहेत. ती देखील मदत अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे ते म्हणाले. निवडणुकांची आचारसंहिता असल्याचे कारण पुढे केले जाते पण नैसर्गिक संकटात परवानगी घेऊन मदत देता येते.मदतीसाठी केंद्र सरकारने कर्ज घेण्यास परवानगी दिली असली तरी राज्यातील सरकार ती घेत नाही. कालच दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. या प्रकरणात सरकारला आरोपी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारने बलुतेदारांना पॅकेज दिले नाही.२६ नाभिकांनी आत्महत्या केल्या. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.आगामी अधिवेशनात व बाहेरही सरकारला धारेवर धरणार आहोत. अधिवेशन किमान १५ दिवसांचे व्हावे हा आमचा आग्रह आहे.सरकारने नागपूर अधिवेशन मुंबईत घेण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यामुळे किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात झाले पाहिजे.

राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ आहे. मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. सरकारने सारथीची वाट लावली.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त केले. या सरकारला निर्णय घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. फक्त घोषणा केल्या जातात परंतु अंमलबजावणी होत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

लॉकडाऊनच्या काळात भाजपाने जी भूमिका बजावली ती इतर कुठल्याही पक्षाला जमली नाही. या काळात व्हर्च्युअल बैठका घेऊन आम्ही संघटन मजबूत केले. व्हर्च्युअल आंदोलने केली. पदवीधर निवडणुकीत भाजपाला चांगले यश येईल. औरंगाबाद विभागाची जागा आम्ही यापूर्वीही जिंकलेली आहे आणि आताही जिंकू. एकनाथ खडसे यांचा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Top