आयुर्वेद ही सर्वोत्तम उपचारपद्धती - आ. धिरज देशमुख
कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या लातूरकरांना आ. धिरज देशमुख यांचे आवाहन
'माधवबाग' आयुर्वेदिक रुग्णालयाचे आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर : आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद ही सर्वोत्तम उपचारपद्धती आहे. याबाबत प्रबोधन वाढणे हेही गरजेचे आहे, अशी अपेक्षा आमदार धिरज देशमुख व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, पण कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या, सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करा. तरच आपल्याला कोरोनाची दुसरी लाट रोखता येईल, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी लातूरकरांना केले.
शहरातील राजीव गांधी चौक परिसरात सुरू झालेल्या माधवबाग या आयुर्वेदिक रुग्णालयाचे उद्घाटन आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. गायत्री देपे, अर्जुन महानुरे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. गोविंदराव घार, गोविंदराव चिलकुरे, माधवराव कोळगावे, अनंत नेरळकर, अनिल कोरडे, डॉ. प्रशांत याकुंडी, महेश घार, मनोज चिखले, सुभाष भिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
धिरज देशमुख म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने 2020 हे वर्ष किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव आपणा सर्वांना कोरोनामुळे झाली आहे. उत्तम आरोग्याबरोबरच सुखी आयुष्य नेमके कशात आहे, हेही सर्वांना समजले आहे. तसा बदल आपण आपल्या जीवनशैलीत, वर्तणुकीत करायला हवा. कोरोना होऊ नये यासाठी आपण आजवर काळजी घेतली. अशी काळजी यापुढेही घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रतिकार शक्ती वाढवणे, व्यायाम-योगासन करणे यावर भर द्यावा. मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. याकडे दुर्लक्ष करू नये.
लातूर व परिसरातील रुग्णांना अद्ययावत आयुर्वेदिक उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. गायत्री देपे आणि अर्जुन महानुरे यांचे धिरज देशमुख यांनी स्वागत केले. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद ही सर्वोत्तम उपचारपद्धती आहे. याबाबत प्रबोधन वाढणे हेही गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अनंत डोंगरे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.