मराठा बिझिनेस असोसिएशनच्या माध्यमातून मराठा तरुणांना मिळणार व्यवसायाचे मार्गदर्शन
पुणे : नविन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पुण्यातील तरुण मराठा व्यावसायिकांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा बिझिनेस असोसिएशन या नवीन व्यावसायिक व्यासपीठाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केली. यामध्ये जास्तीत मराठा तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांना प्रोत्साहन देणे, नवीन व्यावसायिकांना सरकारच्या योजनांची माहिती देऊन त्याचा पुरेपुर लाभ मिळवून देणे, हा या नवीन व्यासपीठाचा मुळ उद्देश असल्याचे मराठा बिझिनेस असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले आहे. मराठा समाजाला व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने व्यावसायिक तरुणांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या सर्व अडचणी सोडविण्यासाठी हे व्यासपीठ विनामूल्य मदत करणार आहे.
मराठा बिझिनेस असोसिएशनच्या या व्यासपीठाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील राहणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावागावात स्वयंसेवक असणार आहेत. हे स्वयंसेवक गावपातळीवर व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विनामूल्य मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती सदर व्यासपीठाचे स्वयंसेवक उद्योजक श्री संदीप पाटील यांनी दिली.
यावेळी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक माऊली दादा टिंगरे, अरविंद फाजगे पाटील, गणपती सावंत, विश्वास गुळणकार, विनायक मुळे, ह.भ.प. राजाराम कड, अविनाश दिघे, दीपक कोंडे, संग्राम जगताप, माधव पवार, विजय गुंजाळ, अनिल सुरवसे, जय पाटील, पांडुरंग रानवडे, योगेश उबाळे, किरण नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्या प्रकारे मराठ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी रणभूमी गाजवली तशीच आता हे नवउद्योजक मराठे उद्योगाची बाजारपेठ गाजवतील असे प्रतिपादन अरविंद फाजगे पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पुण्यातील डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक, उद्योजक, विध्यार्थी तसेच परिसरातील नागरिक या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उपस्थितांनी सदर व्यासपीठाचे कौतुक करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, आणि जमेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक संदीप पाटील यांनी केले व स्वप्नील पाटील आणि विनायक मुळे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. आणि शरद कात्रजकर यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.