Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

रुक्मिणी कदम : शेतमजुरी ते महिना लाख रुपये कामावणारी यशस्वी उद्योजिका

रुक्मिणी कदम : शेतमजुरी ते महिना लाख रुपये कामावणारी यशस्वी उद्योजिका

लातूर : शेतात मोल-मजूरी करुन आपला व आपल्या कुटूंबाचा उदर्निरवाह करणारी सर्वसाधारण महिला मनात आणलं तर काय करु शकते याचे उदाहरण म्हणजेच तळणी गावच्या रुक्मिनी कदम होय. आपल्या कुटूंबाला आर्थिक सक्षम करत सोबतच्या चार-चौघींनाही स्वत:च्या पायावर उभारुन खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर केले आहे. रुक्मिणी कदम यांनी शेतमजूर ते महिना लाखभर रुपये कमावणारी यशस्वी उद्योजिका होऊन समाजत उद्योग करण्यासाठी वेळ बरोबर नाही, पैसा नाही, कोणी मदत करत नाही, सरकार आम्हाला मदत करत नाही व बँका पैसे देत नाहीत असे म्हणत रडत बसणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

कोरोनाच्या काळात सगळेच आर्थिक अडचणीत सापडले होते. अनेकांना आपली नौकरी गमवावी लागली तर काही जनांना आपला व्यवसाय बंद करावा लागला, परंतू मनात जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी असल्यास संकटात ही संधी सापडते असेच काही तळणीच्या रुक्मिणी कदम यांच्या बाबतीत घडले. कोरोनामुळे मुरुम या सासरवाडीत राहून शेतात मोलमजूरी करणाऱ्या रुक्मिणी आपल्या दोन मुलींना घेवून माहेरी तळणी या गावी आल्या. वडीलांचीही परिस्थीती बेताचीच. घरात कमावणारी कमी अन खाणारे जास्त यामुळे काय करावे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर पडलेला. या विचारांनी सतत डोक्यात धुमाकूळ घातलेला असतानाच एका दिवशी त्यांनी आपल्या मोबाइलवर कमाईसाठी एखादा लहान व्यवसाय पहावा म्हणुन त्यांनी सुरुवात केली. अनेक दिवसांच्या शोधा नंतर त्यांना (स्लिपर) चप्पल तयार करण्याचा उदयोग दिसला. मग काय रुक्मिणी कदम यांनी या व्यवसायाची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली. या व्यवसायासाठी कच्चा माल कोठून आणायचा? मशीनरी कोठून आणायची तयार केलेला माल कोठे विकायचा या सर्व बाबींची माहिती घेवून त्यांनी व्यवसाय करण्याचे मनाशी पक्के ठरवले.

कोणताही व्यवसाय सुरु करव्याचा तर भांडवल अत्यावश्कचं याबाबत सांगताना रुक्मिणी कदम सांगतात की, माझ्याकडे मोल-मजूरी करुन जमा केलेली काही शिल्लक होती. यासोबतच बचत गटांची मला खुप मदत झाली. जमा शिल्लक व बचत गटाचे कर्ज घेवून स्वरुप फुट इंडस्टी या व्यवसायाची सुरुवात केली. तयार झालेल्या चप्पल सुरुवातीला जवळच्या गावात, तालुक्याच्या ठिकाणी व शहरात विकायला सुरुवात केली. चप्पल चांगल्या कॉलिटीच्या असल्याने अल्पावधीतच मागणी वाढायला लागली. मग सोबत म्हणुन सुरुवातीला माझ्या बहिणीला चप्पल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. गावातल्या आजू-बाजूच्या काही महिलाही या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी येवू लागल्या. त्यातील काही महिलांनी काम करण्याची ईच्छा व्यक्त केली मग त्यांना ही प्रशिक्षण देवून पगारीवर सोबत घेतले. चार महिला व घरातील आई-वडील यांनी मिळून दररोज तयार होणारा माल वाढू लागला. आता हा जास्तीचा माल विकण्यासाठी मोठी बाजारपेठ असावी यासाठी परत यु-टयुब वर शोध सुरु केल्याचे रुक्मिणी सांगतात. काही दिवस शोधल्या नंतर मेगा मार्ट या ऑनलाईन खरेदी - विक्री करणाऱ्या संस्थेसोबत करार केला असल्याचे त्यांनी सांगीतले.

नविन व्यवसायाबद्दल भरभरून बोलताना रुक्मिणी कदम सांगतात की, मला दोन मुली आहेत. मला परिस्थितीमुळे शिकता आले नाही पण माझ्या मुलींन मला खुप शिकवायचे आहे. आता छोटा असलेला हा व्यवसाय मोठा करण्याचे व सोबतच गावातल्या महिलांन प्रशिक्षण देवून त्यांना ही स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला असल्याचे रुक्मिणी कदम यांनी शेवटी सांगीतले.

Top