Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

संकटाच्या काळात संकट मोचक व्हा - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

 

संकटाच्या काळात संकट मोचक व्हा - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर (जिमाका) : नैसर्गीक आपत्ती, साथरोग किंवा कोणतेही संकट कोणासही सांगून येत नाही अशा असलेल्या प्रत्येक संकटाचे निवारण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी संकटमोचक म्हणून जबाबदारीने काम करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

नविन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जागतिक आपत्ती, धोके निवारण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, नुतन पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, तात्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अधिष्ठता डॉ. मोहन डोईबळे, सहायक संचालक (हिवताप) डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, कोणतीही नैसर्गिक आपत्ती संकट पूर्व कल्पना देवून येत नाही. या संकटात प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गाने संकटाला संधी म्हणून संकट मोचकाचे काम करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.लातूर जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा असून पहिल्या पासूनच नैसर्गिक संकट आपत्तीस धैर्याने सामोरे जात आहे. सध्या जिल्हयात कोरोना प्रार्दुभावावरही मात करण्यात आपण निश्चितच यशस्वी होणार आहोत. या कोरोना संसर्गाची काळजी करण्याची गरज नाही परंतु प्रत्येकांनी दक्षता बाळगण्याची नितांत गरज असून भौतिक अंतर पाळावे असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हयातील प्रत्येक विभागातील कोरोना नोडल अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, आशा सेविका यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देवून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने तात्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, तात्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, लातूर शहर पोलीस उपाधिक्षक सचिन सांगळे यांचा समावेश आहे.

यावेळी लातूर येथील पोलीस अधिक्षक पदावर बदली झालेले डॉ. राजेंद्र माने व लातूर शहर पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांचा प्रशासनाच्या वतीने भेट वस्तू देवुन निरोप देण्यात आला. तसेच नविन पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, तात्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, नुतन पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी आपले मनोगत व्यकत्‍ केले.

या कार्यक्रमास जिल्हयातील वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, महसूल, आरोग्य व जिल्हा परिषद विभागातील कोरोना योध्दे मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी केले तर आभार तहसिलदार महेश सावंत यांनी व्यक्त केले.

 

Top