Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

पार्किंग सुविधा द्या मगच दंड वसूल करा अन्यथा आंदोलन - गुरुनाथ मगे यांचा इशारा

पार्किंग सुविधा द्या मगच दंड वसूल करा अन्यथा आंदोलन - गुरुनाथ मगे यांचा इशारा

लातूर : शहर मनपाच्या वतीने शहरातील वाहुकीला शिस्त लावण्यासाठी  नो पार्किंगच्या ठिकाणी उभा केलेल्या वाहनांकडून दंड वसूल करण्यासाठी निविदा देण्यात आलेली आहे. या निविदाधारकांकडून लातूरकरांची आर्थिक लूट होत असून अनेक वाद-विवाद होऊ लागलेले आहेत. वास्तविक मनपाच्या वतीने प्रथम पार्किंग सुविधा देणे अपेक्षीत असतानाही केवळ नागरीकांना वेठीस धरण्यासाठी हा प्रकार घडू लागल्याचा आरोप करत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी आधी पार्किंग सुविधा द्या मगच दंड वसूल करा असा सल्ला दिलेला आहे. त्याचबरोबर हा सल्ला लातूरकरांच्या  आर्थिक हितासाठी अंमलात नाही आणल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गुरुनाथ मगे यांनी दिलेला आहे.

शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला असून वाहतुकीसाठी वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. या वाहतुकीला शिस्त लागणे अपेक्षीत आहे मात्र वाहतूकीला शिस्त लावताना मनपाच्या वतीने आधी सुविधा देणे गरजेचे आहे. लातूकरांना ठिक-ठिकाणी वाहने उभे करण्यासाठी पार्किंग सुविधा देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहने ज्या ठिकाणी उभी करायची आहेत त्या ठिकाणी असलेली अतिक्रमणेही काढणे तितकेच महत्वाचे आहे. वाहने कुठे उभे करायची यासाठी रस्त्यांवर पिवळे पट्टे मारणे क्रमप्राप्त आहे. मात्र या प्रकारची कोणतीही सुविधा न करुन देता मनपाने  वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली नो पार्किंगच्या ठिकाणी उभा केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी निविदा दिलेली आहे. सदर निविदाधारक अतिशय अरेरावी करीत असून वाहनधारकांना वेठीस धरु लागलेला आहे. त्यामुळे लातूरकरांना मोठा मानसिक त्रास होत असून त्यांची आर्थिक लूटही होऊ लागलेली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस असून खरेदीसाठी बाजारात येणार्यांची संख्या वाढू लागलेली आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत सदर निविदाधारक अधिकच जोमाने वसुली करु लागलेला आहे. आपल्या निविदेच्या रक्कमेपेक्षा अधिकची रक्कम वसुल करण्यासाठी त्याचा आटापीटा चालू  असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून लातूरकरांची आर्थिक लूट होऊ लागलेली आहे. ही बाब निदर्शनास आणून देत शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी आधी पार्किंगच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली असून मगच दंड वसुली करावी असा सल्ला दिलेला आहे. हा सल्ला लातूरकरांच्या हितासाठी असून यावर तात्काळ अंमलबजावणी नाही झाल्यास भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गुरुनाथ मगे यांनी दिलेला आहे.

Top