Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मतदान केंद्रावर मुक्कामी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा दयाव्यात -जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत

मतदान केंद्रावर मुक्कामी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा दयाव्यात -जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत

जिल्हयातील 88 मतदान केंद्रावर 41 हजार 189 मतदार बाजावणार मतदानाचा हक्क

सर्व मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा असल्या पाहीजेत

पहिल्या प्रशिक्षणास विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस दयाव्यात

लातूर (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 05- औरंगाबाद पदवीधर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जिल्हयातील 88 मतदान केंद्रावर 41 हजार 189 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. या 88 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा संबंधित तहसिलदार, तलाठी यांनी उपलब्ध्‍ करुन दयाव्यात, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित 05- औरंगाबाद पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे,अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, औरंगाबाद पदवीधर निवडणूकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 88 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्यासाठी थंडीच्या अनुषंगाने चांगल्या सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध्‍ कराव्यात. तसेच पहिल्या प्रशिक्षणास विना परवानगी गैर हजर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ दयाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदार यादी वर्किंग कॉपीची अत्यंत दक्षतापूर्वक तपासणी करावी. व जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधांची खात्री करावी व तसे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी देऊन जिल्हयातील दिव्यांग मतदार (116) व 80 वर्षापुढील ज्येष्ठ मतदार (23) यांच्या घरी जाऊन त्यांना मतदान केंद्रावर किंवा घरुन मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती दयावी. व जे मतदार घरुन मतदान करणार आहेत त्यांच्याकडून फॉर्म-12 ड भरुन घ्यावा, असे ही त्यांनी सूचित केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी करावी. तर घरुन मतदानाची नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व जेष्ठ मतदार (80 वर्षे पुढील) यांचे मतदान दिनांक 1 डिसेंबर रोजी करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व्हीडीओ चित्रीकरणसह अनुषंगिक कार्यवाही व नोंदी ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी दक्षतापूर्वक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुसरे व दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी तिसरे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मतदान केंद्रावर एक ही चूक होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रिसाईडींग ऑफिसरची डायरी व बॅलेट पेपर अकाऊंट हया महत्वपूर्ण बाबी आहेत. यामध्ये कोणाकडून ही हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे ही त्यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पोलिस बंदोबस्त, पोस्टल मतदान, प्रशिक्षण, पार्किंग व्यवस्था, आरोग्य सुविधा, वेब कॉस्टींग, पोलिंग पार्टी डिस्पॅच व रिसीव्हींग, कोवीडच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना, स्वीप कार्यक्रम आदिंचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शिंदे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदान संघ निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने झालेल्या तयारीची माहिती दिली. तसेच पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीप अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन सांगितले.

Top