ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून संघटना बांधणी करा - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
पालकमंत्री अमित देशमुखांचे खैरे यांनी केले कौतुक
निलंगा (प्रशांत साळुंके) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उध्दव आहेत. आपले ते कुटुंबप्रमुख आहेत. महाविकास आघाडीतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा घराघरात पोहोचविण्यासाठी काम करत संघटना बांधणी करावी. त्याचा फायदा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुकीत होईल, असा कानमंञ शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.
निलंगा येथे आयोजित ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर औरंगाबादचे शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, कामगार नेते शिवाजीराव माने, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, महिला आघाडीच्या शोभा बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुकाप्रमुख अविनाशदादा रेशमे, संघटक शिवचरण पाटील, भागवत वंगे, पंडित भंडारे, रेखा पुजारी आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते तथा माजी खा.चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाकाळात महाराष्ट्रात मुख्यमंञी उध्दव ठाकरे महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठे काम केले. भाजपावाले फक्त बोलत राहिले.प्रत्यक्ष मदतीसाठी माञ ते उतरले नाहीत. महाराष्ट्रात आपले सरकार आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करून घ्या. लातूरचे पालकमंञी जरी काँग्रेसचे असले तरी ते महाविकास आघाडीचे आहेत. त्यांचे कामही चांगले आहे. ते दुजाभाव करत नाहीत, कारण ते विकासरत्न विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत, असे म्हणत पालकमंञी अमित देशमुख यांचे खैरे यांनी कौतुक केले.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निलंगा आणि औसा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करा, या दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यांतील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.