Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

बंड्याचं प्रदेशाध्यक्षपद...!

बंड्याचं प्रदेशाध्यक्षपद...!

मागच्या काही दिवसात बंड्या जाम खुश होता. त्याला कारणही तसंच होतं. अचानकच बंड्याला रामराम करणाऱ्यांची संख्या वाढली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकात नशीब आजमावून पहावं असा विचार करणाऱ्या बंड्याचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतलं जाऊ लागलं होतं. त्यामुळं बंड्या चार बोट उंचावरून चालत होता.

आता प्रदेशाध्यक्ष व्हायचं म्हटल्यास तयारी नको का करायला? म्हणून त्यानं तयारी सुरू केली. सर्वात अगोदर 'घरच्या अध्यक्षांची' परवानगी घ्यावी म्हणून त्यानं विचारलं "व्हय गं, ते परदेशाध्यक्ष व्हावा म्हणत्यात. काय करू, सांगशीला का? बंड्याचा प्रश्न तोंडातून बाहेर पडतो न पडतो तोच समोरून उत्तरांची मालगाडी धावू लागली. हितं जवारीला  पाणी द्याचं ऱ्हायलय. सोयाबीनचं भाव वाढलय. त्याला आडतीला घालायचं हाय. जनवारं मोकार फिरत्याती. त्यासली चाराव लागन. दूध कमी झालंया आन तुमी म्हनतावा  परदेशाध्यक्ष व्हायाचं. कसं व्हणार बघा तुमचं? काय बरं बोलावं ह्या मानसाला... मालगाडी सुस्साट धावतच व्हती. कलकल ऐकून बंड्या घराबाहेर पडला.

चार दोस्तांचा इचार घ्यावा म्हणून तो चावडीवर गेला तर थितं इजू, वैजू, शैलू अशी दोस्त मंडळी बसलेली... त्यांनी बी थेटच इषयाला हात घातला. काय अध्यक्ष, कुटं निघालो? बंड्या मनोमन ओशाळला. खरंच आपन अद्यक्ष झालो काय? असं त्याला वाटू लागलं. आरं तसं न्हाई.. निगालो व्हतो. मनलं तुमास्नी बोलावं आन मग शेताकडे जावं. अस्स होय, आरं काय हाय ती परदेशाध्यक्ष? होऊन जा की गड्या. आपल्या गावाला पुन्ना  मिळणार न्हाई असलं काय... तुमचं खरं हाय बाबा, पर हाय त्यो धंदा बंद करून थितं फुकट राबावं लागतया, फिरावं लागतीया. कुठून घालायचं पैकं. बापानं ठिवलय तेव्हढं खावं गुमान आपलं. हिथं चांगलं चाललंय. बाईसाहेबांनी गेलसाली रोजगार दिलाय की... त्योच सांभाळावा मनतोया... अरं बाबा तुजं खरं हाय, पर काय ना काय झालं असतंच की... तेवडच आमची भी फोटू निगाली असती... मग काय करतू..?

बंड्या पुन्ना इचारात पडला...काय करावं या इचारात त्याचं डोस्क गरगरू लागलं.. अध्यक्ष व्हायाचं मनलं तर हाय ती बी सोडावं लागणार व्हतं.. मनुनच त्यो इचार करत व्हता... पन अखेर त्यानं ठरिवलं आन त्यो तडक म्याडमकडी गेला. तर काय? म्याडम त्येला शर्टाला पकडून जोरजोरात हलवू लागली. उटा की आता.. उटा की... बंड्याला कळना गेलं अजून तर आपून परदेशाध्यक्ष झालो बी नाय... तर लगेच उटा..? त्येनं न ऱ्हावून इचारलय... तर बायकू वरडली... जावा की रानात... जनवारं वरडत असतीला..!

- श्रीनाद

Top