Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

निलंगा तालुक्यात युवकांना संधी; 4 ग्रामपंचायत बिनविरोध

निलंगा तालुक्यात युवकांना संधी; 4 ग्रामपंचायत बिनविरोध

निलंगा (प्रशांत साळुंके) : निलंगा तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, त्यात स्थानिक राजकीय नेतेमंडळींना धक्का देत मतदारांनी तरूणाईला पसंती दिली आहे. निलंगा तालुक्यात भाजप, काँग्रेसला मतददारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

निलंगा तालुक्यातील कासारशिरशी ग्रामपंचायतींमध्ये आमदार अभिमन्यु पवार यांचे समर्थक असलेले पंचायत समिती सदस्य जिलानी बागवान यांच्या पॅनेलचा पराभव झाला. विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके यांच्या अंबुलगा (बु.) गटातील 8 पैकी 7 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या पत्नी संतोषीबाई लातूरे यांचा बालकुंदा ग्रामपंचायतीत पराभव झाला आहे. निलंगा भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे यांच्या तगरखेडा येथील पॅनलचा पराभव झाला आहे. होसूर येथील भाजप जिल्हा संघटक तानाजी बिरादार यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. याठिकाणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांचा विजय झाला आहे.

हासुरी गटाच्या सदस्या अरूणा बरमदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला असून, भाजपाचे ज्येष्ठ सावरी येथील कुमार पाटील यांनी विजय मिळवला आहे. शिरूर ग्रामपंचायतमध्ये भाजप अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अमीर पटेल यांच्या पॅनेलचा विजय झाला.लांबोटा येथे दहा वर्षांपूर्वी बिनविरोध ग्रामपंचायत आणलेल्या भाजपचे कट्टर समर्थक लालासाहेब देशमुख यांच्या पत्नीला व त्यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. त्याच गावातील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य महेश देशमुख यांच्या पॅनेलचा विजय झाला.विशेष म्हणजे महेश देशमुख व लालासाहेब देशमुख हे पंचायत समिती निवडणुकीत आमने-सामने होते. तेव्हाही महेश देशमुख यांनी लालासाहेब देशमुख यांचा पराभव केला होता.

    हाडगा येथील सर्वपक्षीय पॅनेलचे प्रशांत वाघमारे यांच्या पॅनेलचा विजय झाला असून, त्याठिकाणी काँग्रेसचे तानाजी डोके यांचा पराभव झाला आहे.

Top