Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

लसीकरणाबाबतच्या जनजागृतीसाठी ही योग्य वेळ - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

लसीकरणाबाबतच्या जनजागृतीसाठी ही योग्य वेळ - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

कोरोना लसीकरण व आत्मनिर्भर भारतच्या जनजागृतीसाठी बहुमाध्यम प्रदर्शनी व्हॅनचा शुभारंभ

लातूर (जिमाका) : लसीबाबतची चुकीची माहिती व अफवा यांना आळा घालण्यासाठी लसीकरण व जनजागृती मोहिम एकाच वेळी होणे आवश्यक आहे. मात्र कोरोना संपलेला नसून कोरोनाची लस सामान्य माणसापर्यंत पोहचेपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्या देशात तयार झालेली लस सुरक्षित आहे याबद्दल खात्री बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी क्षेत्रीय  लोकसंपर्क ब्युरो सोलापूर यांच्या वतीने कोविड 19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारतच्या जनजागृतीसाठी बहुमाध्यम प्रदर्शनी व्हॅनच्या शुभारंभप्रसंगी केले. 

लोकांना भाषणापेक्षा लोकगीत, संगीत आणि कलाकृतीच्या माध्यमातून देण्यात येणारा संदेश सहज, सोप्या भाषेत संदेश समजतो आणि यामाध्यमातून लोकांवर त्याचा प्रभाव दिसून येतो. हे जनजागृतीचे लोककला हे अतिशय चांगले साधन आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुक्ताई बहुउदेशिय सेवा भावी संस्था व सर्वधर्म समभाव कला मंडळ,लातूर या कलापथकाने सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. 

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे यांच्या सहकार्याने  लातूर जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण व आत्मनिर्भर भारत याबाबत  जनजागृती करण्यात येणार आहे. लातूर जिल्हयात आज या प्रदर्शनी व्हॅनचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आला. उदगीर, अहमदपूर, औसा, रेणापूर, चाकूर, जळकोट, शिरुर ताजबंद, निलंगा, शिरुर अनंतपाळ  या तालुक्यांमध्ये 10 दिवस जनजागृती करणार आहे.  

यावेळी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे , जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकूश चव्हाण,क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो सोलापूर कार्यालयाचे सतीश घोडके,जब्बार हन्नूरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Top