Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांसाठी बँकांनी तात्काळ कर्ज पुरवठा करावा - नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांसाठी बँकांनी तात्काळ कर्ज पुरवठा करावा - नरेंद्र पाटील

* प्रत्येक बँकेने शाखा व्यवस्थापकांपर्यंत महामंडळाच्या योजनांची माहिती पोहोचवावी

* महामंडळाच्या योजनांच्या यशस्वीतेसाठी बँकांची भूमिका महत्वाची.

* लातूर जिल्हयाला 1 हजार कर्ज प्रकरणे करण्याचे उद्दिष्ट.

* या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाला बँकांनी कर्ज पुरवठा करावा

लातूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअतंर्गत वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा तसेच गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना सुरु आहेत. या तिन्ही योजनांतर्गत जिल्हयातील सर्व संबंधित बँकांकडे आलेल्या कर्ज मागणी प्रस्तावांना बँकानी तात्काळ कर्ज पुरवठा केला पाहीजे, असे निर्देश अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महामंडळाच्या योजनांच्या आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीनिवासन, जिल्हा उपनिबंधक सामृत जाधव, भारतीय स्टेट बँकेचे विभागीय प्रबंधक अभिजीत पांगरेकर, महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत जाधव यांच्यासह इतर अधिकारी व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, या महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळातील मराठा समाजातील लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. तसेच बहुतांश बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना ही मंडळाच्या योजनांची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व प्रथम बँकांच्या मुख्य व्यवस्थापकांनी आपल्या शाखा व्यवस्थापकांपर्यंत योजनांची सविस्तर माहिती पोहोचवावी. व बँकेच्या शाखेकडे प्राप्त होणाऱ्या व त्यातील पात्र असलेल्या कर्ज प्रकरणांना बँकांनी तात्काळ मंजूरी दिली पाहीजे, असे निर्देश त्यांनी दिले. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करुन आर्थिक दृष्टया स्वावलंबी होण्यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना महत्वाच्या असून बँकांनी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. लातूर जिल्हयाला किमान एक हजार कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून याकरिता बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी व मराठा

समाजातील तरुणांना वित्त पुरवठा करावा. वित्त पुरवठयाची संबंधित कर्जदारांनी नियमित परतफेड करावी. त्यानंतर महामंडळाकडून 12 टक्के व्याजदराने परतावा लाभार्थ्यांना देण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या या योजनांतर्गत राज्यात 400 कोटीचे वाटप करण्यात आले असून हया योजना 17 जिल्हयात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. बँकांनी कोणत्याही प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना कर्ज पुरवठा केला तरी त्या सर्व व्यवसायांसाठी महामंडळाची कर्ज परतावा योजना लागू आहेत. यात कोणत्याही उद्योग व्यवसायाची अडचण नाही.

बीड, परभणी व औरंगाबाद या जिल्हयात या अंतर्गत्‍ चांगले काम झालेले आहे. परंतु लातूर जिल्हयात 107 कर्ज प्रकरणांत 7 कोटी 15 लाखाचे वित्त पुरवठा झालेला आहे. व हे समाधानकारक नसल्याने सर्व बँकांनी त्वरित प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढून किमान 500 कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.  जिल्हयातील कर्ज प्रकरणांत वाढ होण्यासाठी भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक व महाराष्ट्र ग्रामीण तसेच सहकारी बँकांनी अधिक पुढाकार घ्यावा. कोणत्याही सबबी न सांगता मार्गदर्शक तत्वाप्रमाणे बँकांनी कर्ज प्रकरणे निलाकली काढावेत, असे निर्देश पाटील यांनी देऊन ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका स्तरापर्यंत बैठका घेणार असल्याचे सांगितले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी साठी प्रत्येक बँकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. बँकांच्या अडचणी सोडविल्या जातील. परंतु एकही पात्र कर्ज प्रकरण प्रलंबित राहता कामा नये. तसेच मराठा समाजातील तरुणांनी या योजनांचा लाभ स्वत:घेऊन त्याबाबत समाजातील इतर बेरोजगारांना माहिती दयावी. महामंडळाकडे निधीची कमतरता नाही. तसेच शासन पूर्णपणे समाजातील तरुणांच्या पाठीशी असल्याचे पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या या योजना मराठा समाजातील तरुणांसाठी महत्वाच्या असून बँकांनी यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून किमान 500 लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केल्यास त्याचा परतावा ही मंडळांकडून मिळेल व ही योजना यशस्वी होईल, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. व लातूर जिल्हयात लाभार्थ्यांचा मेळावा लवकरच आयोजित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बँकांच्या अधिकाऱ्यांनी ही बँकांना महामंडळाच्या कर्ज प्रकरणात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तसेच यावेळी लाभार्थ्यांनी ही बँकाकडून या योजनेच्या कर्ज प्रकरणात कशा पध्दतीने टोलवा टोलवी होते याची माहिती सांगितले. या सर्व सूचनांचे निराकरण महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची औसा येथे तालुकास्तरीय बैठक अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, तहसिलदार शोभा पुजारी यांच्यासह बँकाचे अधिकारी उपस्थित होते. या महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजातील नव व्यवसायिक उद्योजक व बेराजगार तरुणांना व्हावा याकरिता महामंडळाकडून औसा येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे.त्यामुळे युवकांना व्यवसाय निवडण्यात अडचण भासणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. तसेच सर्व तालुकास्तरावर बँकर्सनी महामंडळाच्या योजनांची माहिती घ्यावी. व या अंतर्गत आलेल्या कर्ज प्रकरणांना मंजूरी देण्याचे निर्देश दिले.

Top