Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाच्या संचालक पदी गणेश रामदासी रूजू

माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाच्या संचालक पदी गणेश रामदासी रूजू

औरंगाबाद (वि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाच्या संचालक पदावर गणेश रामदासी हे आज रूजू झाले. लातूर विभागाचे उपसंचालक तथा मराठवाडा विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे यांच्याकडून त्यांनी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री.भंडारे यांनी श्री.रामदासी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, माहिती सहायक श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

रामदासी हे यापूर्वी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात उपसंचालक  (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. पदोन्नतीने ते औरंगाबाद येथील कार्यालयात संचालक पदावर रूजू झाले आहेत. यापूर्वी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी 13 वर्षे काम पाहिले आहे. त्यानंतरच्या काळात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबत विविध केंद्रीय मंत्रालयातही त्यांनी सुमारे चार वर्षे काम पाहिले आहे. तत्पूर्वी तत्कालीन कृषी राज्यमंत्री तारिख अन्वर यांचे अतिरिक्त खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी दीड वर्षे काम केले आहे.

दिल्लीत प्रसार भारती संचालक पदावरुन सप्टेंबर 2018 मध्ये ते उपसंचालक (प्रशासन) म्हणून राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात मुंबई येथे रूजू झाले होते. नुकतीच त्यांची पदोन्नतीवर औरंगाबाद विभागीय संचालक पदी बदली झाली आहे. मुळचे निलंगा (जि.लातूर) येथील असणारे श्री.रामदासी हे शासकीय सेवेपूर्वी दिल्ली व लातुरात पत्रकारितेत कार्यरत होते.

Top