Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

प्रधानमंत्री मानधन योजनेतून शेतकर्‍यांसाठी पेन्शेन

प्रधानमंत्री मानधन योजनेतून शेतकर्‍यांसाठी पेन्शेन  

अधिक महितीसाठी शेतकर्‍यांनी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा

पुणे (एलसिएन ऑनलाइन) : केंद्र शासनाने देशातील शेतकर्‍यांच्या हितासाठी दि. 9 ऑगस्ट 2019 पासून देशात प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक शेतकरी भाग घेऊ शकणार असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

म्हैसेकर यांनी अधिक माहिती सांगताना म्हटले की, या योजनेत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. यात लाभधारक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीलासुद्धा निवृत्तिवेतन मिळण्याची तरतूद आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी दि. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत भाग घ्यावा. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्र/सामायिक सुविधा केंद्र यांच्याकडे स्वतःचा 7/12 चा उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती घेऊन संपर्क साधावा. पोर्टलवर सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करायची आहे. त्यासाठी शेतकर्‍यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.

या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना, कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन योजना व यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे शेतकरी अपात्र असतील. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना याचबरोबर उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र नसतील, असे म्हैसेकर यांनी सांगितले. 

शासकीय कार्यालयांशी संपर्क साधावा

लाभार्थी हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन हप्ता म्हणून जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी त्यांना मिळणार्‍या आर्थिक साहाय्यातून वरील मानधन योजनेतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी बँकेचे फॉर्म भरून देऊन या योजनेत होऊ शकतात. लाभार्थी शेतकर्‍यास पेन्शन कार्डदेखील मिळणार आहे. अधिक महितीसाठी शेतकर्‍यांनी आपले संबंधित तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात त्यांचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याने अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍तांनी केले आहे.

Top