Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

केबल धारकांना पक्के बिल देणे बंधनकारक

केबल धारकांना पक्के बिल देणे बंधनकारक

केबल धारकांनी केबल ऑपरेटर्सकडे पक्क्या बिलाची मागणी करावी असे आवाहन 'ट्राय'कडून करण्यात आले आहे

लातूर (lcn24 ऑनलाइन) : केबल ऑपरेटर्सने यापुढे ग्राहकांना कोणत्याही परिस्थिती पक्के बिल देऊन त्या बिलामध्ये आकारण्यात आलेल्या शुल्काची वेगवेगळी माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एमएसओ आणि 'केबल ऑपरेटर्स'ना दिल्या आहेत. या शिवाय 'एमएसओ'ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहकांच्या बिल आकारणीचा मागील सहा महिन्यांपर्यंतचा डेटा ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. 

'ट्राय'ने ब्रॉडकास्टिंग संदर्भात नवे धोरण लागू केल्यानंतर डिश टिव्ही आणि केबल कंपन्यांनी त्यांच्या व्यवस्थेमध्ये अनेक बदल केले. त्याचबरोबर आधी केबलसाठी जी दर आकारणी केली जात होती त्यातही बदल झाले. केबलच्या चॅनेल्सच्या शुल्कासह काही इतर शुल्काचाही त्यामध्ये समावेश झाला असल्याने संबंधित शुल्काची माहिती ग्राहकांना कळणे बंधनकारक असून ती माहिती केबल ऑपरेटर्सने बिलाद्वारे द्यावी, अशा सूचना सर्व केबल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक लोकल केबल ऑपरेटरकडे 'जीएसटी' रजिस्ट्रेशन आणि 'जीएसटी नंबर' असणे अनिवार्य असून त्याशिवाय 'जीएसटी'ची आकारणी करता येणार नाही. जीएसटी नंबर नसूनही केबल ऑपरेटर्स 'जीएसटी'ची आकारणी करत असतील तर त्यांची तक्रार नोंदवावी, असे 'ट्राय'कडून सांगण्यात आले आहे. 

सध्या केबल ऑपरेटर्सकडून साधे बिल दिले जाते. कोणत्या प्रकारची शुल्क आकारली आहेत, याची माहिती दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी 'ट्राय'कडे करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींना प्रतिसाद देऊन 'ट्राय'ने सर्व केबल कंपन्या आणि ऑपरेटर्सना सक्त ताकीद देऊन पक्की बिले देण्याच्या सूचना केल्या आहेत. पुण्यात आणि महाराष्ट्रात चालणाऱ्या हाथवे आणि जीटीपीएल हाथवे या दोन एमएसओ कंपन्यांनाही या सूचना लागू होणार आहेत. कंपन्यांना आता चॅनेल्सचे एमआरपीनुसार दर, त्यावर आकारण्यात येणारा जीएसटी, नेटवर्क कपॅसिटी फीची रक्कम आणि अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यासा त्याचा तपशील बिलामध्ये देणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसेल, असा विश्वास 'ट्राय'कडून व्यक्त करण्यात आला आहे. केबल ऑपरेटर्सना बिलामध्ये चॅनेल सबस्क्रिप्शनचा एकूण दर, जीएसटीची रक्कम, नेटवर्क कपॅसिटी फीची रक्कम, केबल नेटवर्क साहित्याचा दर (आकारला जात असल्यास) हा तपशील ग्राहकांना द्यावा लागणार आहे.

केबल धारकांनी त्यांच्या केबल ऑपरेटर्सकडे पक्क्या बिलाची मागणी करावी.

'ट्राय'ने दिलेल्या सूचनेनुसार आता नव्या पद्धतीनुसार बिलाची मागणी ग्राहकांनी करावी, असे आवाहन 'ट्राय'कडून करण्यात आले आहे. ग्राहकांच्या बिलांचा सहा महिन्यांचा डेटा केबल कंपन्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावा, अशीदेखील मागणी ग्राहकांना करता येणार आहे.

Top