Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

भाजपामध्ये मेगाभरती नाही, निवडक नेत्यांनाच प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपामध्ये मेगाभरती नाही, निवडक नेत्यांनाच प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : भारतीय जनता पार्टीमध्ये मेगाभरती चालू असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही निवडक नेत्यांना पक्षात प्रवेश देत असून पक्षामध्ये ९८ टक्के नेते मुळचेच असून नव्या नेत्यांमुळे प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे रविवारी केले.

महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, यात्राप्रमुख व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, खा. विकास महात्मे, खा. सुधाकर शृंगारे, आ. सुधाकर भालेराव, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रवक्ते गणेश हाके आणि शिरीष बोराळकर उपस्थित होते.

एका प्रश्नाच्या उत्तरात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपामध्ये नेत्यांनी प्रवेश करण्याला मेगाभरती असे नाव माध्यमांमध्ये दिले असले तरी ही महाभरती नाही. ज्यांना विधानसभेत पक्षाची उमेदवारी दिली जाईल अशा चार नेत्यांना आतापर्यंत पक्षामध्ये घेतले असून अजून असे चारपाच नेते समाविष्ट केले जातील. भाजपा शिवसेना महायुतीचा आणि जागांचा विचार करूनच अशा नेत्यांचा समावेश केला जातो. पक्षात मूळ भाजपाचे नेते ९८ टक्के आहेत तर दोन टक्के बाहेरून घेतलेले आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होत नाही.

मा. मुख्यमंत्री म्हणाले, “अनेकदा पक्षाची शक्ती वाढते त्यावेळी आत्मसंतुष्ट होतो आणि विचार करतो की, आता कशासाठी विस्तार करायचा. पण मला वाटते की सातत्याने शक्तीसंचय केला पाहिजे. नेत्यांच्या बाबतीत निवडक व्यक्तींचा समावेश करत असलो तरी कार्यकर्त्यांच्या बाबतीत मोकळेपणाने प्रवेश दिला जातो.” ते म्हणाले की, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस बी टीम होत असून वंचित बहुजन आघाडी ए टीम होत आहे, असे आपण काल सांगल्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सवाल केला की, आपण ज्योतिषी आहोत का. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपली आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सामान्य माणसालाही समजते की या पक्षांच्या पाठीशी उभे रहायला कोणी तयार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आरश्यात पहावे. आपल्याला त्यांना सांगायचे आहे की, आपण आरश्यात नाही तर लोकांच्या चेहऱ्यात पाहतो आणि लोकांच्या चेहऱ्यात जे दडले आहे, ते आम्हाला दिसते. आरश्यात पहायची वेळ कोणावर आली आहे, हे सांगायची गरज नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह सोलापूर येथे जाहीर सभेत यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप करतील. आतापर्यंत महाजनादेश यात्रेने २४४३ किलोमीटरचा प्रवास केला असून ८३ विधानसभा क्षेत्रांत ही यात्रा पोहचली आहे. यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सवानंतर होणार आहे. ही यात्रा एकूण १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये यात्रा जाईल. पाच वर्षात राज्यात आम्ही जी कामे केली त्याचा लेखाजोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडतो आहोत. यात्रेला महाराष्ट्राच्या सर्व भागात प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः मराठवाड्याने अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. जनतेचे आपण मनःपूर्वक आभार मानतो.

त्यांनी सांगितले की, लातूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्या संदर्भात आम्ही निर्णय केला आहे की, उजनी धरणाचे पाणी लातूरला देण्यात येईल. त्यासाठी दोन बोगद्यांचे काम वेगाने चालू आहे. आतापर्यंत या कामासाठी १४०० कोटी रुपये दिले आहेत. उजनी धरणाच्या पाण्याच्या आधारे लातूरच्या पाणीसमस्येवर कायमचा तोडगा काढू, हा आपला शब्द आहे.

ते म्हणाले की, गेले दोन दिवस मराठवाड्यात पाऊस आहे. आशा करू या की, अजून पाऊस येईल आणि दिलासा मिळेल. पण पाऊस आला नाही तर लातूरची पिण्याची पाण्याची समस्या भीषण होईल. त्यामुळे पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रविवारी सकाळी बैठक झाली. वेळ आली तर लातूरमध्ये भीषण पाणी टंचाईची अवस्था येऊ नये, यासाठी सर्व पर्याय तयार ठेवण्याचे आदेश आपण दिले आहेत.

त्यांनी सांगितले की, आपल्या सरकारचे पुढचे लक्ष्य मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी मोठी गुंतवणूक करणे हे आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारने दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. मराठवाडा वॉटरग्रीड या योजनेच्या माध्यमातून ६४,००० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून मराठवाड्यातील सर्व धरणे एकमेकांना जोडून सर्व शहरे व गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यात येईल. त्यासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यांची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची टेंडर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. दुसरा प्रकल्प कोकणात समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी उचलून गोदावरी खोऱ्यात आणण्याचा आहे. त्याचा जलआराखडा तयार झाला आहे. जलपरिषदेची मान्यता मिळाली आहे. मंत्रिमंडळाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. एकूण प्रकल्पापैकी २५ टीएमसीचा डीपीआर तयार झाला आहे. बाकीचा तयार करण्याचे काम चालू आहे. या प्रकल्पासाठी कितीही निधीची गरज पडली तरी तो खर्च करू.

ते म्हणाले की, मराठवाड्याच्या हिश्याचे १०२ टीएमसी पाणी अडविण्यासाठी धरणे बांधून झाल्यामुळे आता नवी धरणे बांधायची नाहीत, असा निर्णय यापूर्वीच्या सरकारने घेतला आहे. पण पाण्याचा प्रवाह बदलणे आणि अन्य कारणांनी पाणी वाहून जाते आणि १०२ पैकी सरासरी ८० टीएमसी पाण्याचाच वापर होत आहे. त्याची भरपाई कशी करायची आणि वाहून जाणारे पाणी कसे अडवायचे यासाठी स्वतंत्र नियोजन करत आहोत.

Top